कांचन प्रकाश संगीत : कवि और कविता

0

ढग

ढगात पाऊस
पावसात झाकोळ
उमटत नाहीत मित्राची पाउले
उगाच हळव्या आठवणींनी जीव मात्र उले……

आठवण

आठवणीतले दिवस
दिवसात दडलेले सुगंध पहिलेवहिले
जाई जुई केवडा बकुळ निशिगंध मोगरा
पण  घरंदाज अलवार फूल चाफ्याचे कसे विसरले……

ती अनावर दर्वळतात सोनचाफ्याची रूपसी फुले
काय सोनचाफा? नव्हे नव्हे, ती तर ऊन्हाची मुले !!!!!

मी रुसलो नाहिये

मी रुसलो नाहिये
फक्त बसलोय मी………
आईची वाट पाहतोय
माझ्या हम्माईची, म्हणजे
गाईची वाट पाहतोय.

मी तिचं वासरू
ल्हान आहे ना अजून
गवत कडबा खात नाही जून…… तिचा मी तान्हा
माझ्यासाठी तिचा पान्हा.

येईल ती धावत
आचळ भरून गोरस……..
मी दूध पिईन ती चाटेल प्रेमरस
आमच्या आनंदाचा पान्हा
गोकुळी सुखावेल कान्हा !

सरला अंधाराचा मेळ

सरला अंधाराचा मेळ
ही सूर्याची रंगवेळ
सामोरा कोरा दिवस
मांडावा नवीन  खेळ !

वाटा जुन्याच तरिही
पाऊल पुन्हा मळेल
जगण्याच्या कैफाचा
जल्लोष नवा उसळेल !

दुःखाचे टुपतिल काटे
वंचना क्वचित भेटेल
कधि निराश होतानाही
आशेचा हात मिळेल !

कैक अशा रंगांनी
दिवस पुरा रंगेल
सावल्या संगती असुनी
दिवस नवा उजळेल !

निशिगंधाचे  स्वप्न  कालचे

निशिगंधाचे  स्वप्न  कालचे
उमलुन आले मुग्ध सकाळी
पुष्प मंजुषा गाऊ लागल्या
सुगंध  गाणी नवी नव्हाळी……..

फुलाफुलांची गंध मोहिनी
उभी  अशी  एकेक  छडी
ही  निशिगंधा मंद  सुगंधा
ऐल  तडी  मन पैल  तडी !……..

 कांचन प्रकाश संगीत

 साहित्य – संगीत और कला जगत का जाना पहचाना नाम है 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *