खपली KHAPALI – Kavita Naik – कथा कहाणी

1

‘खपली’ एक मराठी शब्द है, जिसका मतलब है ‘पपडी’ यानि  बाहरी आवरण। घाव कितना भी गहरा क्यूँ  ना हो, वक़्त  हर ज़ख़्म  का मरहम है।                                                                                                                            ये कहानी ऐसे शख़्स की है जिसने जीवन में बहुत पैसा कमाया, मगर गृहस्थी का सुख कमा न पाया। अब वो अपनों से दूर एकांत में रहकर जीवन की ‘सेकंड ईनिंग’  बीता रहा थाएक दिन अचानक उसे अपने बच्चों  से  मिलने का मौक़ा मिलता है।                                                                                                                           जिन यादों की परछाईयों को मिटाना चाहो वो फिर से अपना दरवाज़ा खटखटाते हैं तो जीवन में हलचल मच जाती है; मगर बात बच्चों  की हो तो  ज़ख़्म ज़ख़्म नही रहते, भर जाते हैं।                                                              सुभाष राऊत के जीवन का यह पडाव उसे जीने का मकसद दे जाता है, साथ ही दिल के घाव को भर देते हैं

  • कविता नाईक 

खपली

‘सुभाष राऊत…’रिसेप्शनिस्ट ने हाक मारल्याबरोबर सुभाषची तंद्री तुटली.आणखी किती दिवस डॉक्टरांच्या वाऱ्या करायला लागणार कुणास ठाऊक, असा विचार करत सुभाष हातातले ब्लड रिपोर्ट्स सावरत उठला.बरेच दिवस पायाला झालेली जखम बरीच होत नव्हती.त्याचा अंदाज बरोबर होता.शरीरातली साखर वाढली होती.तोंडावर गोड बोलून मनस्ताप देणारा घरजावई असतो ना,तसा हा डायबिटीस! एकदा घरात शिरून ठाण मांडून बसला की त्याला बाहेर घालवणं दुरापास्त.मग त्याला कंट्रोल करावं लागतं.त्याला हाताबाहेर जाऊ न देणे हे मोठं कामच असतं.
‘स्ट्रेस जरा कमी करा मिस्टर सुभाष!’डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघून वॉर्निंग दिली.सुभाषने त्यांच्याकडे बघून मंद स्मित केलं.डॉक्टरनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन त्याला नवीन नव्हतं.हल्ली या गोळ्या नेहमीच्याच झाल्या होत्या.खरं तर आयुष्यभर या गोळ्या घ्यायला हव्यात हे माहीत असूनही जरा शुगर कमी झाली की सुभाष त्या बंद करत असे,बरं त्याला हक्कानं सांगणारंही घरी कोणी नव्हतं.स्वतःहुन स्वतःची काळजी घेणं त्याला जरा जडच जात होतं त्याला.मृदुला गेली आणि सुभाष एकटा पडला.मृदुला होती तो पर्यंत देश विदेश भटकणारा सुभाष तिच्या मृत्यूनंतर इथेच भारतात येऊन राहिला.नाहीतरी काय उरलं होतं आता मिळवायचं? मुलं मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागली होती.मनू जॉर्जियात मोठ्या हुद्यावर होती.पोरीने घेतलेल्या कष्टाचं चीज केलं होतं.लहानपणापासून मनूने अभ्यासाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत कधीही त्रास दिला नाही.सौमिल मात्र आयुष्याच्या बाबतीत उथळ विचारांचा निघाला.त्याचा विचार मनात आला की सुभाष अस्वस्थ व्हायचा.या मुलाची काळजी सुभाषच काळीज पोखरायची आधी.पण आता मात्र त्यानं स्वतःसाठी जगायचं ठरवलं होतं.सुभाषने रिक्षा पकडली आणि तो घरी आला.
घरातली कामं राहूनच गेली होती डॉक्टरकडे जायच्या नादात.वॉशिंग मशीन लावायची होती.तरी बरं की यांत्रिकीकरणामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही वाटत.आपलं प्रत्येक काम मशीन करते, त्यामुळे माणसांची गरज नाही आताशा! पण तरीही,ते कपडे निवडून मशीन मध्ये घालून ती सुरू करावीच लागते! मशीन मनाच्या आणि मनातल्या गरजा नाही ओळखू शकत! कपडे बदलून सुभाष अत्यन्त नाईलाजाने वॉशिंग माशिंकडे वळला. आज मृदुला असती तर?… विचार आल्यासारशी सुभाष ने तो झटकून टाकला. या जर तर च्या गोष्टींना काहीही अर्थ नसतो हे तो जाणून होता. अर्थात कितीही व्यवहारी शहाणपण आलं तरी ते आपल्या वेदना बदलू शकत नाहीत.
असो.त्यानं शांतपणे रेडीओ लावला आणि गाणी ऐकत ऐकत आपलं काम सुरू ठेवलं. तितक्यात फोनची बेल वाजली.’काका, तुमचा सल्ला हवाय,येऊ का घरी?’ सुभाषने आज मात्र त्या मुलांना बोलावण टाळलं.पायाची जखम बरीच होत नव्हती.ती आज जरा जास्तच त्रास देत होती.आज मुलांना टाळल,पण उद्या ती येतीलच पुन्हा!
तसा या सल्ला मागायला येणाऱ्या मुलांचा त्रास नव्हता सुभाषला.त्या मुलांमध्ये त्याला त्याच तरुणपण दिसत होतं.मुलांनाही सुभाषचं कोण कौतुक! काकांकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असत ही त्यांची समजूत पक्की! सुभाषलाही त्यांच्यातलाच एक बनून राहायला आवडत होत! ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ सुभाषला छानच जमायला लागलं होतं.त्याच्या मुलांच्या वयाची ही मुलं.त्या मुलांचे विचार, त्यांच्या आवडी निवडी,त्यांची सुभाषबरोबर वागण्याची पद्धत, सुभाष बद्दलचा त्यांना वाटणारा कौतुकमिश्रित आदर याची सुभाषला फार गम्मत वाटे. कदाचित या मुलांमध्ये त्याला सौमिल आणि मनू दिसत असावी.पण त्याच्याबद्दल तो कधी उघडपणे बोलत नसे.कुटुंबाबद्दल बोलायला तो फारसा उत्सुक नव्हता हे वरकरणी कुणालाही सहज कळावं.अगदी कुणी विचारलच तर अगदी जुजबी माहिती देऊन विषय बदलला जात होता.पण त्याला जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीला नक्कीच जाणवेल की मुलांबद्दल बोलताना सुभाषचे डोळे लखलखतात, कौतुकाची एक सूक्ष्म लकेर चेहऱ्यावर पसरत जाते!
आज काही कुणी येणार नव्हतं घरी.सुभाष थोडा सुस्तावलाच त्यामुळे! नाही म्हणायला पायाची जखम अजूनही डोकं वर काढत होतीच.जखमा या जखमाच असतात नाही? त्यांचं कामच हे, वेदना देत राहणं! काही तशाच राहतात, अश्वत्थामा च्या जखमेसारख्या.विचारांचं तारू एकटं असल्यावर दिशाहीन फिरत राहतं.मग अशा वेळी मोबाईलचा आधार असतो आताशा. डोक्यातल्या विचारांच्या दिशांकडे लक्ष न देता मोबाइलला स्क्रीन वर बोटं सरकत राहतात,आणि मग स्वतःच्या विचारांना गोठवून डोकं स्क्रीन मधल्या प्रतिमांचे कधी गुलाम होऊन जातं कळतच नाही.मोबाइल बघत असताना मध्येच बीप वाजला.मनुचा मेसेज! इतक्या दिवसांनी! नाही म्हणायला अधून मधून कधीतरी करते ती फोन.मधल्या काळात आलेल्या कडवटपणावर काळाची पुटं चढली होती. नाती सहजा सहजी तोडता येत नाहीत हेच खरं! उत्सुकतेने सुभाषने तिचा मेसेज उघडला. pappa, I am coming to India the next week!  सुभाष च्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं!बापाचा जीव मुलीवर तसा जास्तच असतो!मनू तर मुळातच हुशार!कुठलीही गोष्ट पटकन आत्मसात करणारी!तिला लहानपणापासून सुभाष स्वतः घडवत होता.आणि ती देखील मातीच्या मऊ गोळ्याप्रमाणे घडत होती.तिला वाढवताना,तिच्याशी बोलताना सुभाषला कोण कौतुक वाटे! अगदी तिच्या management study पर्यंत सुद्धा तो तिच्या बरोबर होता.तिच्या प्रत्येक गोष्टीत तो तिला गाईड करत होता. अगदी अमेरिकेत तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्यापर्यंत! सुभाष स्वतः एक मोठ्या हुद्यावर होता,पण तरीही आपल्या परिसाठी तिचा शेफ ही झाला होता! अर्थात अति प्रेमानेही समोरची व्यक्ती गुदमरते याची जाणीवही नव्हती त्याला.त्या अति कौतुकाचीच एक दिवस मस्करी झाली, आणि मनूच्या मनातला सुभाष बद्दलचा द्वेष बाहेर पडलाच.’पप्पा, माझा खर्च करतोयस ना तू, म्हणून झेलतेय मी तुला, नाही तर तोंड बघायचं नाही आहे मला तुझं!!!’………या नंतरचे शब्दच सुभाषला ऐकू आले नाहीत.पुढचा किती वेळ सुन्न अवस्थेत गेला कुणास ठाऊक,…
सुभाषचं चेहरा क्षणार्धात घामाने डवरला.अस्वस्थ सुभाष ने मोबाईल बंद केला आणि तो बाथरूम मध्ये शिरला.थंड पाण्याची धार डोक्यावरून खाली ओघळती झाली तेव्हा त्याला जरा बरं वाटलं.थंड धारेबरोबरच शरीराच्या उष्णतेचाही भार पाण्यातून आणि गतायुष्य डोळ्यातूनओघळायला लागलं.मनूच्या त्या जहरी बोलण्याने हतबल झालेला सुभाष अमेरिकेतून एकटा परतला.इतका तिरस्कार?मी इतका वाईट वागलो तिच्याशी?की हे मृदुलाचे विचार मनू बोलली?मृदुला बरोबरचे वाद, मुलांचं वागणं,तिने केलेली पैशांची उधळण, वारंवार केलेली पैशांची मागणी, आणि यातून कंटाळून सुभाषने अख्या कुटुंबाशी घेतलेली फारकत….सगळंच अनपेक्षित! ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो,ती व्यक्ती पैशामुळे इतकी बदलते? त्या पैशाचीच विरक्ती आली सुभाषला . पैशाने संसारात विष कालवल.त्या पैशाने मुलांनाही दूर केलं.पैसे नुसता येऊन उपयोग नसतो, तो झेपवावाही लागतो! हे समजण्यातच अर्ध वय निघून जातं, नाही?
सुभाष बाथरूम मधुन बाहेर आला.मोबाईल वाजत होता.आतिशचा फोन.हल्ली हा मुलगा फार जवळ यायला लागला आहे.नेहमीच काळजीने फोन करतो.विशेष म्हणजे त्याच्या आणि सौमिलच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे.फक्त सौमिल मुंबईत असूनही नसल्यासारखा…….सुभाषने फोन उचलला.’काका, पुढच्या आठवड्यात आम्ही माथेरानला जातो आहोत, तुमच्या साठी एक सीट ठेवली आहे’. सुभाषला खूप कौतुक वाटलं.पण पुढच्या आठवड्यात मनू येणार होती.चेहऱ्यावर कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या येण्याची उत्सुकता होतीच!आतिशला नकार कळवून सुभाष उत्साहाने खाली उतरला.आज खुप दिवसांनी दाढी करावीशी वाटत होती.मनू येतेय! मृदुला गेल्यावर मुलं दिसली ती शेवटची!त्यानंतर आता दिसतील! काळ हे सर्व प्रश्नांचं उत्तर आहे हे खरंच! मधल्या दोन तीन वर्षात बराच कडवटपणा कमी झाला होता.मनू पुन्हा कामापूरत का होईना,बोलायला लागली होती.आता ती येतेय.त्या घरी, जिथं सौमिल होता,आमचं कुटुंब होतं, जे घर आता सुभाषने मनातून काढून टाकलं होतं….सुभाष जवळच्या मॉल मध्ये गेला.त्यानं मनू आणि सौमिलसाठी गिफ्ट्स घेतली.मनू आता इतकी मोठी झाली आहे, भरपूर कमवायला लागली आहे.स्टायलिश बोलायला लागली आहे.म्हणजे पुरती विदेशी झाली आहे.सौमिलही mature झाला असेल! मनू सांगत होती, कसलासा बिझनेस करतोय म्हणे!काहीतरी करतोय हे महत्त्वाचं.मृदुला गेल्यावर आणि सुभाष दुरावल्यावर मनूने सौमिलच जणू पालकत्वच स्वीकारलं होत.मोठी झाली पोर!
आज जेवायला बोलावलंय मनूने.चांगलेसे कपडे करून सुभाष पार्ल्याला निघाला.दोघही तीथेच भेटणार होते.मनातून थोडीशी उत्सुकता,थोडा नर्व्हसनेस, थोडा आनंद! सगळ्याच भावनांची सरमिसळ! झपझप पावलं टाकत सुभाष पार्ला स्टेशन वर उतरला.मुलांना भेटायला थोडासा वेळ होता.सुभाषने बुके घेतला.छोटासाच, नाजूक, मनुसारखा! तेवढ्यात मेसेज ,’we have reached.where are you?’ अरे!मी लवकर पोहोचायचं ठरवलं होतं, पण मुलचं वेळेपेक्षा लवकर आली! त्यांनाही तेवढीच उत्सुकता असेल का मला भेटायची? सुभाष घाईने रिक्षा पकडून हॉटेलवर पोहोचला.त्याला बघून दोन्ही मुलांचे चेहरे आनंदले.पहिल्या दोन वाक्यात आलेलं अवघडलेपण हळूहळू दूर होत गेलं.गतकाळातल्या गमतीजमती बाहेर यायला लागल्या.चौकोनी कुटुंबाच्या कितीतरी गोड आठवणी! पैशांच्या चणचणीतून बाहेर येण्याची धडपड.त्यातून झालेल्या गमती.सुभाष कोषातून बाहेर यायला लागला!पोटभर जेऊन आणि मन भर गप्पा मारून सुभाष घरी परतला.किती mature, झालीत मुलं! मनाच्या दुखऱ्या कप्प्याला जराही हात न लावता फक्त सुखाचे क्षण वेचले तिघांनी!काळ किती प्रभावी असतो नाही!काय घडलं असेल या मधल्या काळात?मुलांना माझी बाजू पटली असेल?त्यांनी ऐकलेल्या एकाच बाजूचा फोलपणा कळला असेल?की पोरकेपणाच्या जाणिवेने आलेली पोकळी भरून काढण्यासाठी ते माझ्याकडे आले असतील?जे काही असेल,पण आज कितीतरी वर्षांनी मी आज माझ्या कुटुंबात वावरलो! आज या प्रसंगी मृदुला….पण माहीत नाही, आज ती असती तर कदाचित मी माझ्या मुलांना भेटू शकलो नसतो.कदाचित तिच्या जाण्यामुळेच मुलांना मला भेटावं वाटलं असेल.कदाचित….कदाचित,जर,तर हे शब्द किती फसवे आहेत!एखाद्या मृगजळाप्रमाणे! वस्तुस्थिती ही आहे की आज माझी मुलं मला भेटली,माझ्याबरोबर रमली! नियतीचा फार विचार करायचा नाही.तिला तिच्या लहरीने वागू दे.आपण तिने दिलेल्या प्रत्येक प्रसंगात आनंद शोधायचा!
सुभाष उत्साहाने पुढच्या कमला लागला.काम तरी काय? प्रचंड पैसा पहिला होता,आलिशान रहाणी उपभोगली होती.आता आयुष्य शांतपणे, मनासारखं काढायचं होतं.पण आता ही जखम…..तरी खूप वेळाने त्याच लक्ष पायाकडे गेलं.जखम सुकत नव्हती.त्याला औषध लावायचं राहिलं होतं.पण दुखणं कमी झालं होतं.
मनू पुन्हा एकदा परतीच्या प्रवासावेळी भेटणार होती.पहाटेच्या फ्लाईट ने जाणार म्हणून तिनं मला रात्रीच राहायला बोलावलं होतं.
पुढचे काही दिवस सुभाषने याच विचारात घालवले.पुन्हा त्याच घरात जायचं!पुन्हा त्या घराच्या आठवणी,त्या जुन्या खुणा, त्या जुन्या जखमा…द्विधा मनस्थितीतच सुभाषचे पुढचे दिवस गेले….
रात्रीच जेवण आटपून सुभाषने ट्रेन पकडली.आज बऱ्याच वर्षांनी घरी जात होता तो.ओळखीच्या खुणा पचवत तो दाराशी येऊन उभा राहिला.बेलवर कितीतरी वेळ त्याची बोटं घुटमळली.बेल वाजवायला हवी! मनातले शब्द जणू कानात नीट ऐकू येत होते.मनू दारात उभी . ती सुभाषला घेऊन आत गेली.सौमिल ने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं होतं.सुभाषला काही क्षण काहीही सुचेना.पण काहो क्षणच.मनू लगेच येऊन पप्पाला चिकटली आणि गप्पांचा ओघ सुरू झाला.रात्रभर जागायला हवं होतं.गप्पांशिवाय दुसरा चॉईस नव्हता! मग काय ! एकमेकांच्या अंगावर पडून लोळत लोळत गप्पा सुरु झाल्या.दोन्ही मुलं जणू लहानच झाली होती.पुन्हा एकदा सुखद आठवणींना पान्हा फुटला.पुन्हा एकदा सुभाषचा चेहरा मुलांच्या कौतुके भरून गेला.पूर्वीचा पप्पा, पूर्वीची मनू आणि तोच पूर्वीचा उगाचच हुशाऱ्या मारणार सौमिल! परकेपणाचा लवलेशही उरला नाही.एकमेकांबद्दलच्या अपेक्षा संपल्या की दुरावाही संपतो ! रात्र मजेत सरली, आणि मनूला सोडायला सुभाष आणि सौमिल दोघेही गेले.
मनूला सोडून सुभाष ट्रेन मध्ये बसला.
आता कधी भेटतील कुणास ठाऊक! पण आज सुभाषच्या मनात याबद्दल जराही वेदना नव्हती.त्याच मन समाधानानं भरून गेलं होतं.स्वच्छंदी पाखरांना मोकळच सोडावं! एकमेकांबरोबर राहून पायातली बेडी होण्यापेक्षा लांबूनच क्षितिज ओलांडू पाहणाऱ्या जहाजांना कौतुकानं पहात रहावं! दीपस्तंभासारखं! सुभाषने समाधानाचा सुस्कारा टाकत डोळे बंद केले.
अचानक त्याला आपल्या जखमेची आठवण झाली.खूप दिवस झाले, डॉक्टरांकडे गेलोच नाही.त्याचा हात पायाकडे गेला.जखमेवर हात जाताच त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं,…त्याच्या जखमेवर खपली धरली होती!!

——————————————————

‘कविता नाईक’ Well known RJ के साथ-साथ मराठी रंगमंच और मराठी साहित्य का जाना पहचाना नाम है.

1 thought on “खपली KHAPALI – Kavita Naik – कथा कहाणी

  1. फार सुंदर हृदयस्पर्शी कथा. अभिनंदन कविता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *